मुंबई । राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची मान्सूनची प्रतीक्षा आणखी काही दिवस वाढणार असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता अत्यल्प असून बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. मात्र, मंगळवारपासून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून १ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या कक्षेत येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
८ जूनपासून मान्सूनची प्रगती संथावली असून गेल्या काही दिवसांपासून त्याचा प्रवास जवळपास ठप्प झाला आहे. सोमवारी मान्सूनने आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांत प्रगती केली होती. मात्र त्यानंतर त्याची वाटचाल मंदावली. आता २३ जूननंतर महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक भागांत पेरण्या रखडल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पूर्व विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
आज पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
उष्णतेची लाट कायम
राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा चटका कायम असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव, अकोला आणि वर्धा येथे तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
शेतकऱ्यांचे लक्ष आता २३ जूनकडे
मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने हवामान विभागाने दिलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाऊस कधी आणि किती होतो याकडे राज्यभरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. २३ जूननंतर मान्सूनला वेग मिळाल्यास राज्यातील पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता व्यक्त होत आहे.














Discussion about this post