जळगाव/मुंबई । संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी आणि कोकण किनारपट्टीवरील दमट हवामानामुळे होरपळून निघाला आहे. जळगावसह खान्देशात तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४४ अंशाच्या पार गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा या रणरणत्या उन्हात होरपळणाऱ्या जळगावकरांना आणि राज्यातील जनतेला दिलासा देणारी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेआधीच अंदमानात धडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) १४ ते २० मे दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला असला तरी, ‘स्कायमेट’ या देशातील अग्रगण्य खासगी हवामान संस्थेने यंदा पावसाचे आगमन अधिक लवकर होईल, असा अंदाज दिला आहे. येत्या १२ आणि १३ मे रोजी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात (श्रीलंका, मालदीव आणि कोमोरिन परिसरात) एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या द्रोणीय पट्ट्यामुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल. परिणामी, दरवर्षी साधारणपणे २० मे रोजी दक्षिण अंदमानात पोहोचणारा मान्सून यंदा त्यापूर्वीच हजेरी लावू शकतो.
सर्वसाधारणपणे २० मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात पोहोचतो आणि त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजे २२ मे रोजी तो उत्तर अंदमान, पोर्ट ब्लेअर आणि माया बंदर भागात व्यापतो. परंतु, यावर्षी १२-१३ मे दरम्यान तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल, ज्यामुळे पाऊस लवकर येण्यास मदत होईल.
एकीकडे पावसाची प्रतीक्षा असताना, राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. जळगावात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला असून गेल्या २४ तासात जळगावच्या कमाल तापमानात अचानक दोन अंशांची वाढ झाल्यामुळे तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळी पडणाऱ्या कडक उन्हामुळे जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, वाढत्या उष्म्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.जळगाव जिल्ह्यात मे महिन्याचे अजून बरेच दिवस बाकी असल्याने आगामी काळात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे.















Discussion about this post