जळगाव । शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात एक दुर्दैवी घटना घडली. निर्माणाधीन इमारतीवर काम करत असताना ३२ वर्षीय मुकेश गोकुळ सोनार यांचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. अचानक बांधकामाचा भाग धसल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत मुकेश सोनार यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने सोनार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनास्थळी सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याची चर्चा स्थानिकांकडून केली जात आहे. बांधकामस्थळी सुरक्षा साधनांचा योग्य वापर झाला होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.















Discussion about this post