मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना राज्याच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले. या भेटीनंतर जयंत पाटील सत्तेत सहभागी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कोणतेही राजकीय समीकरण असल्याचे नाकारले. “जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि सात वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते आहेत. ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना विविध कारणांसाठी भेटू शकतात. त्या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही जयंत पाटील यांच्या क्षमतेचे कौतुक केले. “अजित पवार यांनी अर्थखाते उत्कृष्टपणे सांभाळले होते. त्यांच्या नंतर अर्थखात्याची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्याकडे आहे. मात्र ते आमच्यासोबतच आहेत,” असे त्या म्हणाल्या.
या विधानांमुळे जयंत पाटील यांच्या संभाव्य भूमिकेबाबतच्या चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. मात्र, अर्थमंत्रीपदाबाबत किंवा सत्तेत सहभागी होण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याने राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post