जळगाव । सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच असून आज शुक्रवारी (१७ जुलै) जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सोन्याच्या दरात मात्र किरकोळ २०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.
जळगाव सराफा बाजारातील दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ९०० रुपये (विनाजीएसटी) इतका झाला आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख २० हजार रुपयांवर आला असून एका दिवसात तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील बदल आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्याचबरोबर सध्या दागिन्यांची मागणीही तुलनेने कमी असल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
जुलै महिन्यातील दरांचा आढावा घेतल्यास, ९ जुलै रोजी सोन्याचा भाव १ लाख ४३ हजार ५०० रुपये होता. त्यानंतर दरात टप्प्याटप्प्याने घसरण होत १७ जुलै रोजी तो १ लाख ४१ हजार ९०० रुपयांवर आला आहे. चांदीचाही दर २ लाख २७ हजार रुपयांवरून घसरत २ लाख २० हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावरील Goodreturns संकेतस्थळानुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात ७६० रुपयांची घसरण होऊन भाव १ लाख ४२ हजार ५३० रुपये झाला आहे. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले असून चांदीचा भाव प्रतिकिलो सुमारे २ लाख ३० हजार रुपये नोंदविण्यात आला आहे.















Discussion about this post