चाळीसगाव । मालेगाव तालुक्यातील दहिवाळ फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात आई-वडिलांसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी राकेश शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह मालेगाव येथे नातेवाईकांच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते छोटा हत्ती वाहनातून गावाकडे परतत असताना दहिवाळ फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत जयश्री राकेश शिंदे (वय १९) हिचा जागीच मृत्यू झाला. तर राकेश शिंदे, त्यांची पत्नी, धाकटी मुलगी नंदिनी शिंदे (वय १६) आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.
स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना नंदिनी शिंदे हिची प्रकृती चिंताजनक बनली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिचा जीव वाचवता आला नाही.
अल्पावधीतच दोन मुलींचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हिरापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू असून संबंधित वाहनचालकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.















Discussion about this post