जळगाव । राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता वाढली असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. जळगावात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर पोहोचला असून जळगावकर उन्हाच्या झळांनी हैराण झाला आहे.
महाराष्ट्रावर निर्माण झालेली प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण भागात उष्ण व दमट वातावरण तयार झाले आहे. आज आणि उद्या कोकणात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यानंतर अमरावती येथे ४३.८, वर्धा येथे ४३.५, नागपूर व चंद्रपूर येथे ४२.२, यवतमाळ येथे ४२.६, वाशिम येथे ४२.४, जळगावात ४२.२, बुलडाणा येथे ४१.६ आणि गोंदिया येथे ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेता रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार आणि रिक्षाचालक अशा बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयएमडीच्या येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्याची विश्रांती, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.















Discussion about this post