अहिंसा सदभावना शांती यात्रेतून समतेचा संदेश; गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम

जळगाव : जगात संघर्ष, अस्थिरता आणि परस्परावलंबित्व वाढत असताना महात्मा गांधीजींच्या अहिंसा, शांतता आणि सदभावनेच्या विचारांची आज अधिक गरज आहे. स्वदेशी, स्वच्छता, ग्रामविकास, पारंपरिक व्यवसायांचे जतन, श्रमदान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार करूनच सुजाण नागरिक म्हणून सक्षम पिढी घडू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विश्व अहिंसा दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित अहिंसा सदभावना शांती यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. लालबहादूर शास्त्री टॉवरपासून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता महात्मा गांधी उद्यानात झाली.यावेळी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपवनसंरक्षक अधिकारी सौरेश सहाय, मनपा आयुक्त आदित्य जीवने, प्रांत अधिकारी योगेश कुमार मीणा, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, राजेंद्र मयूर, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डीन गीता धरमपाल आणि अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उदय महाजन व गीता धरमपाल यांनी मान्यवरांचे तिरंगा सूतीहार देऊन स्वागत केले. खासदार स्मिता वाघ यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. दीपस्तंभच्या दिव्यांग कलाकारांनी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए…’ या गीताचे सादरीकरण केले.
शास्त्री टॉवरपासून गांधी उद्यानापर्यंत यात्रा
लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत अहिंसा सदभावना शांती यात्रेला प्रारंभ झाला. पंडित नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक मार्गे ही यात्रा महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सूतीहार अर्पण करून यात्रेची सांगता झाली.
यात्रेत विद्यार्थ्यांनी भारत माता, कस्तुरबा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. बैलगाडीवरील चरख्यावर अखंड सुतकताईचे सजीव सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. विविध शाळा, संस्था आणि नागरिकांसह शेकडो जळगावकरांनी यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रोहन घुगे यांनी गांधीजींच्या जीवनातील आत्मपरीक्षणाचा संदर्भ देताना सांगितले की, गांधीजींची महानता त्यांनी कधीच चुका केल्या नाहीत यात नसून, स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही यात होती. ‘माझे सत्याचे प्रयोग’मधून त्यांनी आपल्या जीवनातील प्रसंग मोकळेपणाने मांडले. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सद्भावना, श्रमदान आणि स्वच्छता हे विचार त्यांनी केवळ सांगितले नाहीत, तर आचरणातून दाखवून दिले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘भारत की संतान’मधून विविधतेचे दर्शन
अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘गांधीजी के बंदर हम’ हे गीत अभिनयासह सादर केले. तसेच ‘भारत की संतान’ या कार्यक्रमातून देशाच्या विविधतेतील एकतेचा संदेश देण्यात आला. ‘आम्ही सर्व एक आहोत’ हा या सादरीकरणाचा प्रमुख संदेश होता. नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या १८ भाषांमधील विविधता, संबंधित प्रदेशांची वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडविले. या सादरीकरणाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामूहिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
गांधीतीर्थ जिल्हास्तरीय सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील २६ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. संपूर्ण जिल्ह्यात ब. गो. शानभाग विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
ग्रामीण विभागात धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, खिरोदा प्रथम, विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे द्वितीय, र. सु. जैन विद्यालय, तोंडापूर, जामनेर तृतीय, तर एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, वावडदा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. शहरी विभागात ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, शिरसोली रोड तृतीय, तर काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
इंपिरिअल इंग्लिश मीडियम स्कूल, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, हरिजन कन्या छात्रालय, शोधग्राम, ब. गो. शानभाग विद्यालय, एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, सरस्वती प्राथमिक विद्यालय, ला. ना. सार्वजनिक विद्यालय, एनसीसी बटालियन, धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, खिरोदा तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या पीजी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसह विविध शाळा-संस्थांनी यात्रेत सहभाग घेतला. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.















Discussion about this post