देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) २०२६ सालासाठीचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यावर्षी देशात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा आकडा सामान्य मान्सूनच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदा मान्सून काहीसा कमकुवत राहू शकतो. काही भागांमध्ये सामान्य किंवा त्याहून चांगला पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी एकूणच पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी उत्पादन, तलावांची पाणीसाठा पातळी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खासगी हवामान संस्था Skymet Weather नेही काही दिवसांपूर्वी यंदाच्या पावसाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या सुमारे 94 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, यंदा ‘एल निनो’ची परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने ‘एल निनो’ निर्माण होतो आणि त्याचा जगभरातील हवामान व मान्सूनवर परिणाम होतो. सामान्यतः ‘एल निनो’च्या काळात पावसाचे प्रमाण घटते आणि दुष्काळाची शक्यता वाढते.
भारतामध्ये साधारणपणे 1 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघारी फिरतो. देशात दरवर्षी सरासरी सुमारे 87 सेंटीमीटर पाऊस पडतो, त्यापैकी सुमारे 70 टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतच होतो. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास शेती उत्पादन घटणे, अन्नधान्याच्या किमती वाढणे आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते.
हवामान विभागाचा हा पहिला अंदाज असून दुसरा सविस्तर अंदाज मे महिन्यात जाहीर होणार आहे. त्यावेळी मान्सूनची दिशा, आगमनाची वेळ आणि राज्यनिहाय पावसाचे प्रमाण अधिक स्पष्ट होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.















Discussion about this post