जळगाव । जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क भागात असलेल्या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या चोराला शनिपेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत या गुन्ह्याचा अवघ्या काही वेळात छडा लावला असून, एका संशयित आरोपीसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली १२ हजार ५५० रुपयांची रोकड पूर्णपणे हस्तगत करण्यात आली आहे.

योगेश्वर नगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी योगेश्वर देविदास पाटील यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना तात्काळ सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आणि मुद्देमाल हस्तगत करण्याचे कडक निर्देश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांची गोपनीय यंत्रणाही तातडीने कामाला लावण्यात आली.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपी जेरबंद
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रकांत भगवान पाटील (रा. दशरथ नगर, जळगाव) याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनीच मंदिराच्या दानपेटीवर हात साफ केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीची १२ हजार ५५० रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अनिल साळुंखे करीत आहेत.















Discussion about this post