जळगाव । विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने एका कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी जळगाव शहरातील विमानतळ रोड परिसरात घडली. महेश देविदास अपार (वय ३५) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश अपार हे विमानतळ रोड परिसरात विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढले होते. काम सुरू असतानाच अचानक तारांमध्ये वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते खांबावरून थेट रस्त्यावर कोसळले.

घटनेनंतर सहकारी कामगार आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.
‘परमिट’ असतानाही वीजप्रवाह सुरू कसा झाला?
दरम्यान, दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणकडून रीतसर एलटी/एचटी परमिट घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असताना अचानक वीजप्रवाह सुरू कसा झाला, असा सवाल मृताच्या नातेवाईकांसह सहकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेला संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.
चौकशीचे आश्वासन; आर्थिक मदतीची माहिती
घटनेनंतर महावितरणकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेण्यात आली आहे. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना नियमानुसार आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महेश अपार यांच्या मृत्यूला नेमकी कोणाची चूक कारणीभूत ठरली, याचा तपास होऊन दोषींवर कारवाई कधी होणार? असा सवाल नातेवाईक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.















Discussion about this post