जळगाव । जळगाव एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमधील श्री आनंद बॅटरी कंपनीतून शिशाच्या धातूच्या विटा चोरीला गेल्याची घटना ३१ ऑगस्टच्या रात्री घडली होती. कंपनीच्या परिसरातील सिमेंट कंपाऊंडला लावलेली लोखंडी जाळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीत ठेवलेल्या २० शिशाच्या विटा, वजन सुमारे ५०० किलो आणि किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये, चोरून नेण्यात आल्या.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे मालक लखन वासुदेव बुधानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलिसांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत विविध पुरावे गोळा केले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची माहिती मिळवली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापू संतोष भोई, मुकेश राजू परमार, शेख आबिद शेख मोहम्मद आणि शकील शहा रुबाब शहा या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

चोरीचा माल आणि दुचाकी जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी चोरीत सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या १६ शिशाच्या धातूच्या विटा जप्त करण्यात आल्या. या विटांचे एकूण वजन सुमारे ३९० किलो आहे. याशिवाय चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. अशाप्रकारे पोलिसांच्या कारवाईत एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. दरम्यान, चोरीस गेलेल्या एकूण मालापैकी उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील चोरीच्या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण तपास उघडकीस आला आहे.















Discussion about this post