पुणे : विषुववृत्तीय प्रशांत महासागरात अल निनोची स्थिती प्रबळ ते अत्यंत प्रबळ स्वरूपाची असून, २०२६ च्या अखेरपर्यंत ती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ‘मान्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टीम’च्या अंदाजानुसार, जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीतही अल निनोचा प्रभाव तीव्र ते अतितीव्र राहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात २८ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविण्यात येत आहे. यामुळे अल निनोची स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ची स्थिती सध्या तटस्थ आहे. विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या पश्चिम आणि पूर्व भागांत समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असून, पश्चिम भागात तुलनेने अधिक उष्णता जाणवत आहे. संपूर्ण पूर्वानुमान कालावधीत ही तटस्थ स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा
सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात २८ ऑक्टोबरपर्यंत पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.
चक्रीवादळ निर्मितीसाठी अनुकूल स्थिती
मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) सध्या तिसऱ्या टप्प्यात असून, आगामी कालावधीतही ते याच टप्प्यात राहण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरपासून त्याचे आयाम एकापेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एमजेओची ही स्थिती उत्तर हिंदी महासागराच्या क्षेत्रात, म्हणजेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र परिसरात असल्याने आगामी आठवड्यात चक्रीवादळ निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.
एकूणच, प्रशांत महासागरातील अल निनोची स्थिती, हिंदी महासागरातील तापमानातील बदल आणि एमजेओची स्थिती यांवर आगामी काळातील हवामानाचे चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील हवामान अंदाजाकडे लक्ष लागले आहे.














Discussion about this post