मुंबई । तुमचेही बँक खाते देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. HDFC ने लाखो कर्जदारांना मोठा दिलासा दिला असून बँकेने सप्टेंबर महिन्यासाठी विविध कालावधीतील MCLR दरात 5 ते 10 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे MCLR शी जोडलेल्या कर्जांच्या व्याजदरात घट होण्याची शक्यता असून, पात्र ग्राहकांचा EMI देखील कमी होऊ शकतो.
बँकेच्या नव्या निर्णयानंतर HDFC बँकेचे MCLR दर आता 7.90 टक्के ते 8.60 टक्के या दरम्यान झाले आहेत. यापूर्वी हे दर 8 टक्के ते 8.65 टक्क्यांच्या दरम्यान होते. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जदारांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

HDFC बँकेने ओव्हरनाइट MCLR 8 टक्क्यांवरून 7.90 टक्के केला आहे. तसेच एका महिन्याचा MCLR देखील 8 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांचा MCLR 8.15 टक्क्यांवरून 8.05 टक्के, तर सहा महिन्यांचा दर 8.30 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे एक वर्षाचा MCLR 8.40 टक्क्यांवरून 8.35 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या कालावधीतील MCLR मध्ये सर्वाधिक म्हणजे 10 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली असून, हा दर 8.55 टक्क्यांवरून 8.45 टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा MCLR 8.65 टक्क्यांवरून 8.60 टक्के करण्यात आला आहे.

कोणत्या ग्राहकांना फायदा?
MCLR दरातील या कपातीचा थेट फायदा ज्या ग्राहकांच्या कर्जाचा व्याजदर MCLR शी जोडलेला आहे, त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांच्या कर्जाचा व्याजदर कमी झाल्यास त्यांच्या EMI मध्येही घट होऊ शकते. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनाही सुधारित दरांचा फायदा होण्याची शक्यता आहे.सणासुदीच्या काळात HDFC बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्जदारांना व्याजाच्या वाढत्या बोजातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.















Discussion about this post