जळगाव । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या अमानुष प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. चौथीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच शिक्षकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे (वय ५०, रा. द्वारकानगर, जळगाव) याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा गेल्या दोन वर्षांपासून या निष्पाप बालिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. शाळेच्या वेळेत इतर मुले नसताना तो पीडित मुलीला वर्गात एकटे बोलवायचा. त्यानंतर स्वतःच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तो तिच्यावर अत्याचार करायचा. अवघ्या ९ वर्षांच्या या चिमुरडीला काय सुरू आहे हे नीट समजण्याच्या आतच तिच्यावर हा अन्याय सुरू होता.
हा अमानुष प्रकार कोणालाही सांगू नये, यासाठी आरोपी शिक्षकाने नराधमतेची सीमा पार केली होती. “हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर तुझ्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला जीवे मारून टाकेन,” अशी अंगावर काटा आणणारी धमकी तो चिमुरडीला देत होता. या भीतीपोटी ती निष्पाप बालिका कमालीच्या मानसिक दडपणाखाली आणि दहशतीखाली जगत होती. अखेर सुट्ट्यांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेतली.
धरणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी शिक्षक नंदलाल मराठे याच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे. ज्या शाळेत पालकांनी आपल्या पाल्याला सुरक्षित भविष्यासाठी पाठवायचे, तिथेच जर असे लांडगे बसले असतील, तर मुलांनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या विकृत शिक्षकाला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.














Discussion about this post