भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) पदाच्या २५० जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दोन दिवसांनी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांना २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

कनिष्ठ न्यायालय सहाय्यक हे गट ‘ब’ अराजपत्रित पद असून ते वेतन स्तर-६ मध्ये येते. या पदासाठी नियमानुसार भत्त्यांसह दरमहा ३५ हजार ४०० रुपये प्रारंभिक मूळ वेतन मिळणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या २५० जागा तात्पुरत्या असून प्रशासकीय गरजेनुसार पदसंख्येत बदल होऊ शकतो.

पदवीधर उमेदवारांना संधी
या भरतीसाठी उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आणि किमान ३५ शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग आवश्यक आहे.
१ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. SC, ST, OBC-NCL, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या अवलंबितांना अतिरिक्त पाच वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीतील विभागीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी १,५०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC, ST, OBC-NCL, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ७५० रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय लागू असलेले बँक शुल्क उमेदवारांना भरावे लागेल. अर्ज शुल्क केवळ UCO Bank च्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे भरता येणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये दहावीच्या प्रमाणपत्रानुसार नाव, पालकांची नावे आणि जन्मतारीख अचूक नमूद करावी लागेल. त्यानंतर फोटो, स्वाक्षरी, दहावी, बारावी आणि पदवीची प्रमाणपत्रे तसेच लागू असल्यास आरक्षित प्रवर्ग व दिव्यांग प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील.
अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज अंतिमरित्या सबमिट करून त्याची प्रिंटआउट भविष्यातील उपयोगासाठी जतन करणे आवश्यक आहे.















Discussion about this post