मुंबई | अमेरिकेने भारतासह १६ देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार होणाऱ्या वस्तूंची आयात रोखण्यात संबंधित देश अपयशी ठरल्याचा दावा करत अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
व्यवहाराच्या सुरुवातीलाच बीएसई सेन्सेक्स ८७६.०६ अंकांनी (१.१५ टक्के) घसरून ७५,५१५.३३ वर पोहोचला, तर निफ्टी-५० निर्देशांक २५८.८० अंकांनी (१.०८ टक्के) घसरून २३,६१०.८० वर व्यवहार करत होता. या घसरणीमुळे बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे ३ लाख कोटी रुपयांनी घटून ४७३ लाख कोटी रुपये झाले.
सलग पाचव्या दिवशी बाजार लाल निशाणावर
भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदविण्यात आली. रुपयातही कमजोरी दिसून आली असून, डॉलरच्या तुलनेत रुपया ९६.६३ वर उघडला. मागील सत्रात तो ९६.५७२५ वर बंद झाला होता.
सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांचे शेअर्स घसरले. इन्फोसिसला सर्वाधिक फटका बसला. याशिवाय भारती एअरटेल, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, लार्सन अँड टुब्रो, ट्रेंट आणि अदानी पोर्ट्स यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. तर एचसीएल टेक हा एकमेव शेअर वाढीसह व्यवहार करत होता.
निफ्टीमध्ये इटरनल, श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तसेच निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६३ टक्के आणि ०.६२ टक्के घसरले. क्षेत्रनिहाय पाहता रिअल्टी, ऑटो आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सवर सर्वाधिक दबाव राहिला, तर फार्मा आणि आयटी क्षेत्राने तुलनेने चांगली कामगिरी केली.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा जागतिक बाजारावरही परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, कंबोडिया, श्रीलंका आणि युनायटेड किंगडमसह एकूण १६ देशांवर १० टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या व्यापार कायद्याच्या कलम ३०१ अंतर्गत झालेल्या तपासानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी १२.५ टक्के शुल्काचा प्रस्ताव होता.
या निर्णयाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर जागतिक बाजारावरही झाला. आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, जपानचा निक्केई निर्देशांक २,००० हून अधिक अंकांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक जवळपास ६ टक्क्यांनी कोसळला.
कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या
दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे ब्रेंट क्रूडची किंमत मे महिन्यानंतर प्रथमच १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे. इराण समर्थित गटांनी सौदी अरेबियाच्या दोन तेलवाहू जहाजांना लक्ष्य केल्याने जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आठवड्यातच कच्च्या तेलाच्या किमतीत १३ टक्क्यांची वाढ झाली असून, त्याचाही परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होताना दिसत आहे.















Discussion about this post