मुंबई : UPI व्यवहारांवरील प्रस्तावित शुल्काच्या मुद्द्यावरून देशभरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या शुल्काच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ (FAIVM) आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांसारख्या प्रमुख व्यापारी संघटनांनी गांधी जयंती, अर्थात २ ऑक्टोबर रोजी देशभर ‘No UPI Day’ पाळण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या दिवशी अनेक व्यापारी UPI पेमेंट स्वीकारणार नसून ग्राहकांना रोख रक्कम किंवा कार्डद्वारे व्यवहार करावा लागू शकतो.

२ हजारांवरील UPI व्यवहारांवर शुल्काचा प्रस्ताव

येत्या १५ ऑक्टोबरपासून २ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या P2M UPI व्यवहारांवर ०.४० टक्के MDR शुल्क आकारण्याचा प्रस्ताव असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. या शुल्काची कमाल मर्यादा ३०० रुपये ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाचा विशेषतः मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
व्यापारी संघटनांनी या शुल्काला विरोध केला असून, कमी नफ्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवरील आर्थिक भार वाढेल, असा दावा केला आहे. पेट्रोल-डिझेल, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, धान्य आणि कपडे यांसारख्या क्षेत्रांमध्ये आधीच नफा मर्यादित असतो. त्यामुळे UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याचा थेट परिणाम व्यवसायाच्या नफ्यावर होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेशातही व्यापाऱ्यांचा विरोध
या निर्णयाविरोधात मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनीही आंदोलन केले आहे. भोपाल, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेर यांसह विविध शहरांतील सुमारे १२५ व्यापारी संघटनांनी २३ सप्टेंबर रोजी ‘No UPI Day’ पाळला. या आंदोलनामुळे राज्यातील सुमारे २५ टक्के व्यापारावर परिणाम झाल्याचा दावा व्यापारी संघटनांनी केला आहे. मध्य प्रदेशातील आंदोलनानंतर आता २ ऑक्टोबर रोजी देशभर ‘No UPI Day’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांचाही पाठिंबा
महाराष्ट्रातही या आंदोलनाला व्यापारी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) तसेच विविध व्यापारी संघटनांनी २ ऑक्टोबरच्या आंदोलनाला समर्थन दिल्याचे सांगण्यात आले आहे. MACCIAचे अध्यक्ष रवींद्र मंगवे यांनी देशातील विविध व्यापारी संघटनांशी याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, इंदूर रिटेल गारमेंट्स असोसिएशनने शुल्काचा निर्णय मागे न घेतल्यास १५ ऑक्टोबरपूर्वी UPI QR कोडविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे UPI व्यवहारांवरील शुल्काचा मुद्दा आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता असून, २ ऑक्टोबरच्या ‘No UPI Day’कडे व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post