मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात सुरू असलेल्या तुलनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत परखड भाष्य केले आहे. “पंतप्रधान मोदींना नेहरूंसारखा मोठा कार्यकाळ मिळणे चांगली गोष्ट आहे, पण नेहरूंचा काळ, त्यांचे कर्तृत्व आणि देशासाठीच्या योगदानाशी मोदींची तुलना कधीही होऊ शकत नाही,” अशा स्पष्ट शब्दांत पवारांनी टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, पंडित नेहरू आणि गांधी घराण्याच्या देशासाठीच्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकत विरोधकांचे कान टोचले.
भाषण सुरू करताना शरद पवार यांनी वर्तमानपत्रांमधील पक्षाच्या भव्य जाहिरातींवरून मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “आज वर्धापन दिनानिमित्त मला मोठी गंमत वाटली. सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पक्षाची जाहिरात दिसली. मी आजवर कधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली नव्हती; कारण पहिल्या पानावर जाहिरात देण्याची किंमत किती अवाढव्य असते, हे मला माहीत आहे. त्यामुळे मी कधी त्या रस्त्याने गेलो नाही. पण तुमची उपस्थिती पाहता, ही जाहिरात सर्वांसाठी आहे आणि त्याचे स्वागत आपण केले पाहिजे.”
कार्यकर्त्यांना धीर देताना ते पुढे म्हणाले, “सत्ता असो वा नसो, आपण कधी त्याची चिंता केली नाही. आपण सत्ता असली की सत्तेत काम करतो, नसेल तर लोकांमध्ये जाऊन काम करतो.”
“पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा ठेवा, पण तुलना नको”
देशातील सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक यांच्या समस्यांवर भाष्य करत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “काही लोक सातत्याने एकच गोष्ट सांगत आहेत की या देशात मोदींसारखा नेता झालाच नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि आम्ही ती नेहमीच राखतो. पण आजच्या नेतृत्वाची तुलना थेट जवाहरलाल नेहरूंशी केली जात आहे, यावरून मला गंमत वाटते,” असे पवार म्हणाले.















Discussion about this post