बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
बारामती शहरातील रुई येथील साई गणेश नगर परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री किरकोळ कारणावरून मुलीचे तिच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर मुलगी रागाच्या भरात घराबाहेर पडली. मुलगी घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी रात्री पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
दरम्यान, सकाळी घराजवळच मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
रोहित पवार बारामतीत दाखल
या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार बारामतीत दाखल होत असल्याची माहिती आहे. दशावतारे कुटुंबीयांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मुलीने घराबाहेर पडल्यानंतर नेमके काय घडले? तिचा मृत्यू अपघाती झाला की आत्महत्या अथवा अन्य काही कारणामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या रहस्यमय मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post