मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईत जेलभरो आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली असली, तरी दीपके यांनी आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

या आंदोलनाला आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. २ ऑक्टोबरला होणाऱ्या CJPच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिल्लीत जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांनी केलेल्या आंदोलनालाही आपण पाठिंबा दिला होता, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनीही लोकशाहीच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली.

दरम्यान, या मोर्चाच्या एक दिवसाआधीच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी दीपके यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दीपके यांचं बळ अधिकच वाढलं आहे. मात्र, पवार या मोर्चामध्ये सामील होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मोठी घोषणा केली आहे. उद्या 2 तारखेला अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात मुंबईत जेलभरो आंदोलन होणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिबा आहे. तसेच येत्या 4 तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार आहे. या मोर्चालाही आमचा पाठिंबा असणार आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केलं. मात्र, या दोन्ही मोर्चात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार की नाही याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे या दोन्ही मोर्चांमध्ये शरद पवार सामील होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
२ ऑक्टोबरला जेलभरो आंदोलन
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात स्वतंत्र संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. हा मोर्चा भायखळा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा काढण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरच्या CJPच्या जेलभरो आंदोलनानंतर ४ ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरणाकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post