मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाव्य बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांच्या तोंडून आक्षेपार्ह शब्द निघाल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेत सुरुवातीला राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचे कौतुक करत, “ते पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंसोबत असल्याची ठाम भूमिका घेत आहेत. पक्षाने दिलेले स्थान विसरता येत नाही,” असे सांगितले.
यानंतर बोलताना संभाव्य पक्षत्याग करणाऱ्या खासदारांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी अत्यंत संतप्त शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित खासदारांवर बेईमानीचा आरोप केला. राऊत पुढे म्हणाले की, “शिवसेना आमची आई आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. जे खासदार निवडून आले, ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि मशाल चिन्हावर जनतेने निवडून दिले आहेत. गद्दारी करणाऱ्यांनी त्याचे परिणाम भोगावे लागतील.”
संसदीय समितीची बैठक होणार असल्याची माहिती देत राऊत यांनी सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आल्याचे सांगितले. बैठकीनंतर पक्षाची पुढील भूमिका आणि निर्णय जाहीर केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्धव ठाकरे गटातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post