जळगाव : मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि नियमित गाड्यांवरील अतिरिक्त ताण लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते अमरावती दरम्यान विशेष एकेरी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाडीला जळगाव आणि भुसावळसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक ०११५५ विशेष एकेरी रेल्वे १८ जून आणि १९ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ००.२० वाजता सुटणार आहे. ही विशेष गाडी त्याच दिवशी १२.३० वाजता अमरावती येथे पोहचेल. दोन स्वतंत्र फेऱ्यांद्वारे ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकांवर गाडी थांबणार असल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः जळगाव, भुसावळ आणि विदर्भातील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, मुंबई-अमरावती मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत असल्याने रेल्वेला वेळोवेळी विशेष गाड्या चालवाव्या लागत आहेत. उन्हाळी सुट्ट्या, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, नोकरी-व्यवसायासाठी होणारी प्रवासाची वाढती गरज आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमुळे या मार्गावरील गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असते. त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.















Discussion about this post