जळगाव । शहरातील बालाजी पेठ भागातून चोरीला गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल शोधण्यात शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध (DB) पथकाला अवघ्या काही तासांत यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एरंडोल येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
नेमकी घटना काय?
बालाजी पेठ येथील रहिवासी निलेश प्रकाश बोरसे (वय २७) हे बाहेरगावी गेलेले असताना, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी अज्ञात चोरट्याने त्यांची बजाज पल्सर मोटारसायकल चोरून नेली होती. दि. १८ ऑगस्ट रोजी निलेश बोरसे घरी परतल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर १७९/२०२६, BNS ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
CCTV आणि तांत्रिक विश्लेषणाने आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी DB पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पथकाने बालाजी पेठ व परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली. तसेच परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करून संशयिताचा माग काढला. संशयित आरोपी शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल) हा एरंडोल बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कडक चौकशीदरम्यान आरोपीने मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
तीन दुचाकी जप्त
आरोपी शेख इरफान याच्या ताब्यातून पोलिसांनी बालाजी पेठेतून चोरलेली पल्सर, आणखी एक बजाज पल्सर आणि एक होंडा युनिकॉन अशा एकूण तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार (पोहेका/१३५६) विजय खैरे करत आहेत.















Discussion about this post