जळगाव । जळगाव-बांभोरी मार्गावरील मानराज पार्क परिसरात आज गुरुवारी सकाळी कार आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. कार चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. जखमींमध्ये रिक्षाचालक आणि पाळधी येथील एका महिला प्रवाशाचा समावेश असून त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जळगावहून बांभोरीकडे जाणारी कार मानराज पार्क परिसरात पोहोचल्यावर चालकाने अचानक ब्रेक लावला. मागून वेगात येणाऱ्या रिक्षाचालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता न आल्याने रिक्षा थेट कारच्या मागील बाजूस धडकली.
धडकेचा जोर इतका होता की रिक्षाच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे काही काळ जळगाव-बांभोरी मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. स्थानिकांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, या अपघाताबाबत संबंधित पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली जात असून पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post