मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे अनुदान वितरित झाल्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, १२ ते १५ जूनदरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता होती. जून महिना सुरू होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही रक्कम जमा न झाल्याने अनेक महिलांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, सरकार १२ ते १५ जूनदरम्यान मे महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची तयारी करत आहे.
यापूर्वी सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते. काही महिलांना दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये मिळाले, तर काहींना एका महिन्याचाच लाभ मिळाल्याची नोंद आहे.
दरम्यान, ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा योजनेच्या निकषांमध्ये न बसणे अशा विविध कारणांमुळे सुमारे ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
या निर्णयावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे वगळण्यात आलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post