पुणे । पावसाची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजासह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. चालू मान्सून हंगामात जून महिन्यापासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यातील भारतीय हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पावसावर ‘एल निनो’ (El Niño) चा तीव्र प्रभाव पडला आहे. यापूर्वी २०१५ मध्येही असाच एल निनो सक्रिय होता, ज्यामुळे महाराष्ट्रात अत्यंत कमी पाऊस झाला होता. यंदाही याच प्रभावामुळे पावसाने मोठी ओढ दिली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात ५० टक्क्यांहून अधिक तूट
राज्यात सरासरी १६ टक्के तूट असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून तिथे पावसाची तूट ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात ही तूट थेट ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. या भीषण परिस्थितीमुळे या भागातील पिके करपण्याच्या मार्गावर असून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पुढील ५ दिवस पावसाची शक्यता नाही
सध्या महाराष्ट्रात कोणतीही हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नसून मान्सूनचे वारेही मंदावले आहेत. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले नाही. यामुळे आगामी पाच दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची कोणतीही शक्यता नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
परतीच्या पावसाचीही शाश्वती नाही
यंदा १० ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्रातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सध्या परतीच्या मान्सूनसाठी आवश्यक असलेले हवामान अनुकूल वातावरण तयार होत नाहीये. यामुळे परतीचा पाऊसही महाराष्ट्राला हुलकावणी देणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता आणखी वाढली आहे.















Discussion about this post