छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘तुमसे ना हो पाएगा’ आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठवाडा दुष्काळाच्या संकटात असताना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलताना, “फडणवीस, तुमची भाजप पुढच्या वेळी सत्ता पाहू शकणार नाही,” असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. हे त्यांचे राजकीय भाकीत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा खंड पडल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे ठाकरे यांनी म्हटले. सरकारने मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. तातडीने पंचनामे, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांनी मराठवाड्यातील सत्ताधारी पक्षाच्या खासदार आणि नेत्यांनाही लक्ष्य केले. मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मराठवाड्याने निजामशाहीविरोधात लढा दिला. मात्र आजही या भागातील शेतकरी विविध संकटांना सामोरे जात असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.
सरकारकडून ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना पंचनाम्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.“पंचनामे सुरू होऊ द्या; मात्र ते व्यवस्थित होत आहेत की नाही, हे आम्ही तपासणार आहोत,” असे ठाकरे म्हणाले. शिवसैनिकांनी पंचनाम्यांच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.















Discussion about this post