जळगाव । जळगाव जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. यानंतर पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता धरणाचा एक वक्राद्वार दरवाजा ३० सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात १ हजार २३८ क्युसेक (३५.०३ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून २.०५२ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. धरणाची पूर्ण जलाशय पातळी ३९८.०७ मीटर असून सध्या संपूर्ण ६०८.४५ दशलक्ष घनमीटर (१००%) जलसाठा उपलब्ध आहे. सध्या पीएलबीसी कालवा आणि सिंचनासाठीचा विसर्ग बंद ठेवण्यात आला असून, केवळ सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात बदल केला जाणार आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, मासेमारी किंवा जनावरांना नेऊ नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरण पूर्ण भरल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल आणि धरणगाव या भागांतील सुमारे ५२ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा आधार मिळणार आहे. हिवाळी तसेच आगामी उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
गिरणा धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता राहणार आहे. उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन झाल्यास रब्बी पिकांसाठी पाच आवर्तने मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांच्या लागवडीला मोठा आधार मिळू शकतो.















Discussion about this post