पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने (AAP) विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची ‘सेमीफायनल’ मानल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आप’ची जादू पुन्हा एकदा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत ‘आप’ने ६८० पेक्षा अधिक जागांवर दणदणीत विजय मिळवला असून, भाजपला अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे भाजपला पंजाबमध्ये अत्यंत मोठा झटका बसला असून काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचेही या वादळात पार पानिपत झाले आहे.
पंजाबमध्ये २६ मे रोजी ८ महानगरपालिका, ७५ नगर परिषदा आणि २० नगर पंचायतींसाठी मतदान पार पडले होते. आज मतमोजणी सुरू होताच सुरुवातीपासूनच ‘आप’ने आघाडी घेतली आणि विरोधकांना दूर सारले. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला एकहाती सत्ता सुपूर्द केली आहे.
या निवडणुकीच्या काही काळ आधीच भाजपने पंजाबमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले होते. पक्षाने केवलसिंह ढिल्लो यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. नवा चेहरा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल आणि पक्ष निवडणुकीत मोठी झेप घेईल, अशी भाजपची रणनीती होती. मात्र, निकालांनी भाजपच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले आहे. केवलसिंह ढिल्लो यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यात अपयशी ठरल्याचे आणि पक्षाचा जनाधार घटल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा पराभव भाजपसाठी केवळ एक इशारा नसून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी लागलेली मोठी ‘धोक्याची घंटी’ आहे.














Discussion about this post