मुंबई । काल दि १२ रोजी विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. यासाठी १२ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीचे सगळेच नऊ उमेदवारी विजयी झाले तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे मतांचा कोटा पूर्ण असताना शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे महायुतीचे सर्व आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. “विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये बदमाश लोकं सापडलेली आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आम्ही आताच हायकमांडला याबद्दलचा अहवाल सादर केला आहे”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
“गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीवेळी, जे बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात घेतला, त्यांच्या पाठीमागे आम्ही या निवडणुकीत ट्रॅप लावलेला होता. मी कुठेही नाकारत नाही. जे कुणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आले आहेत. अशा विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणी तसं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही”, अशी आक्रमक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.















Discussion about this post