मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या तुरुंगवासाच्या काळातील अनुभवांबाबत धक्कादायक दावा केला आहे. तुरुंगात असताना आपल्या खाण्यातून काही घातक पदार्थ शरीरात गेले असण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आपल्या प्रकृतीत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर झालेल्या बदलांचा तपास होणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी सांगितले की, तुरुंगात असताना कैद्यांच्या अन्न-पाण्यावर काही प्रकारचा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रश्न केवळ आपल्यापुरता मर्यादित नसून तुरुंगात असलेल्या राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांबाबतही अशी शक्यता असू शकते, असा दावा त्यांनी केला.
राहुल गांधींची भेट अन् आरोग्यावर चर्चा
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आरोग्याच्या समस्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी Toxic Test करून घेण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला, असे राऊत यांनी सांगितले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्या आरोग्याशी संबंधित त्रास अधिक जाणवू लागला. त्यामुळे या समस्यांचा संबंध तुरुंगातील काळाशी आहे का, याचा वैद्यकीय पातळीवर तपास होणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी म्हटले.
‘तुरुंगातील परिस्थिती खूपच त्रासदायक’
राऊत यांनी तुरुंगातील राहणीमानावरही भाष्य केले. एका मुलाखतीत त्यांनी तुरुंगातील परिस्थिती अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. अनेक कैद्यांना एकाच खोलीत ठेवले जात होते. हवा, पाणी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांबाबतही अडचणी असल्याचा दावा त्यांनी केला.
आपण हृदयविकाराचे रुग्ण असतानाही या परिस्थितीचा सामना करावा लागला, असे राऊत यांनी सांगितले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रकृतीच्या समस्या वाढल्याने त्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
VIP कोठडीचा राऊतांकडून उल्लेख
तुरुंगातील एका विशेष कोठडीबाबतही राऊत यांनी दावा केला. या कोठडीत इतरांच्या तुलनेत अधिक सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सामान्य कैद्यांना तिथे ठेवले जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले. ही कोठडी कोणासाठी तयार करण्यात आली, अशी विचारणा केली असता विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या आरोपींसाठी ती असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले.संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या तुरुंगवासातील अनुभव आणि आरोग्याच्या समस्यांवरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.














Discussion about this post