जळगाव । उधारीवर पान-सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून जळगाव शहरातील गोदावरी कॉलेज परिसरात एका ४१ वर्षीय व्यक्तीवर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. किशोर बाविस्कर असे जखमी व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणातील तीन संशयित आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पसार झालेल्या संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१) यांनी आरोपींना उधारीवर पान-सिगारेट देण्यास नकार दिला होता. याच कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी बाविस्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, “तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला
वाद वाढल्यानंतर आनंद हरी पाटील याने धारदार कोयत्याने, तर हर्षल रवींद्र शिंदे याने तलवारीने बाविस्कर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू करून संशयितांचा शोध घेण्यासाठी हालचाली वेगाने केल्या.
१२ तासांत संशयित पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रवींद्र शिंदे (वय २०) आणि गौरव विनोद पाटील (वय २०, तिघेही रा. खेडी, ता. जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले. या घटनेत एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.















Discussion about this post