वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील प्रमुख खासगी इंधन विक्री कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने १ जुलैपासून देशभरातील आपल्या सर्व इंधन केंद्रांवर पेट्रोल ५ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. तसेच महत्त्वाच्या समुद्री मार्गांवरील कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्ववत झाल्याने इंधन कंपन्यांवरील खर्चाचा ताण कमी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नायरा एनर्जीने ग्राहकांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे.
देशभरात नायरा एनर्जीचे ७ हजारांहून अधिक पेट्रोल पंप असून, १ जुलैपासून सर्व ठिकाणी नवीन दर लागू करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यातील व्हॅट आणि इतर स्थानिक कर वेगवेगळे असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो.
काही दिवसांपूर्वी आखाती देशांतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरच्या आसपास पोहोचल्या होत्या. त्यावेळी अनेक खासगी कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले होते. नायरा एनर्जीनेही पेट्रोलमध्ये ५ रुपये आणि डिझेलमध्ये ३ रुपयांची वाढ केली होती. आता परिस्थिती सुधारल्यानंतर कंपनीने तेवढ्याच प्रमाणात दर कमी करून ग्राहकांना दिलासा दिला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील करारानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावल्या आहेत. सध्या कच्च्या तेलाचा दर सुमारे ७३ डॉलर प्रति बॅरल असून, त्यामुळे इंधन कंपन्यांवरील आर्थिक दबाव कमी झाला आहे.
दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी २५ मे रोजी या कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ७.५० रुपये, तर डिझेलच्या दरात ७.६० रुपये प्रति लिटर वाढ केली होती.
सध्या देशातील विविध शहरांमध्ये इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. पेट्रोलचा सर्वात कमी दर चंदीगडमध्ये १०१.५४ रुपये प्रति लिटर, तर सर्वाधिक दर हैदराबादमध्ये ११५.६९ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये प्रति लिटर आहे. डिझेलबाबतही चंदीगडमध्ये सर्वात कमी ८९.४७ रुपये प्रति लिटर, तर हैदराबादमध्ये सर्वाधिक १०३.८२ रुपये प्रति लिटर दर आहे. मुंबईत डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लिटर इतका आहे.















Discussion about this post