जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार कमबॅक केले आहे. सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) जळगावच्या सुवर्णपेठेत दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. शनिवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल २ हजार ७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्वस्ताईच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजी आणि डॉलरच्या घसरणीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोमवारी दुपारच्या सत्रात अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. त्यामुळे बाजारात दरवाढीचा वेग स्पष्टपणे दिसून आला.
२४ कॅरेट सोने १ लाख २६ हजारांच्या पार
जळगाव सुवर्णपेठेत सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर विना जीएसटी प्रति १० ग्रॅम १ लाख २६ हजार २०० रुपयांवर पोहोचला. शनिवारच्या १ लाख २३ हजार ५०० रुपयांच्या तुलनेत सोन्यात २ हजार ७०० रुपयांची वाढ झाली. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १५ हजार ६०० रुपयांवर पोहोचला असून, त्यात २ हजार ४८० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
चांदीच्या दरातही मोठी उसळी
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली. शनिवारपर्यंत प्रति किलो १ लाख ५४ हजार रुपयांवर असलेली चांदी सोमवारी १ लाख ५७ हजार रुपयांवर पोहोचली. अवघ्या दोन दिवसांत चांदी किलोमागे ३ हजार रुपयांनी महागली आहे.
घसरणीनंतर पुन्हा दरवाढ; ग्राहकांचे बजेट बिघडले
गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरून नीचांकी पातळीवर आल्याने लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदीचे नियोजनही केले होते. मात्र, आठवड्याच्या सुरुवातीलाच दरांनी घेतलेल्या उसळीमुळे खरेदीदारांचे गणित पुन्हा बिघडले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post