भुसावळ/लंडन : राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक आणि कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे २६ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत इंग्लंडमधील लंडन येथे अभ्यास दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा सखोल अभ्यास केला आहे. भारतीय संसदीय व्यवस्थेची मुळे ज्या ब्रिटिश संसदीय परंपरेत आहेत, त्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी त्यांना या दौऱ्यात मिळाली.
लंडन येथील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर येथे दिवसभर अभ्यासभेट देत त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स या दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धती, अधिकार, संसदीय परंपरा आणि विधिनिर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जनतेने निवडून दिलेले सदस्य शासनाची जबाबदारी निश्चित करणे, प्रश्नोत्तराचा तास, अर्थसंकल्प, विधेयकांवरील चर्चा आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात. तर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये विधेयकांचे सखोल परीक्षण, तज्ज्ञांचे विचारमंथन आणि घटनात्मक विषयांवर चर्चा केली जाते. या सभागृहातील ऐतिहासिक राजसिंहासन, शतकानुशतकांच्या संसदीय परंपरा तसेच राज्य उद्घाटन सोहळ्याविषयीही त्यांनी माहिती घेतली.
या अभ्यासभेटीदरम्यान ब्रिटिश संसदेचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास, मॅग्ना कार्टापासून विकसित झालेली संसदीय परंपरा, संसदीय समित्यांची कार्यपद्धती, विरोधी पक्षाची भूमिका, छाया मंत्रिमंडळ ही संकल्पना, संसदीय शिस्त, ऐतिहासिक दालने, संसदीय ग्रंथालय आणि संसदेची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना यांचाही त्यांनी अभ्यास केला.
प्रा. डॉ. नेवे यांनी भारत आणि ब्रिटनच्या संसदीय व्यवस्थेची तुलनाही केली. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च असून तेथे अलिखित संविधान आणि संसदीय सार्वभौमत्वाची संकल्पना अस्तित्वात आहे. तर भारतात संविधान सर्वोच्च असून संसदेने केलेल्या कायद्याचे घटनात्मक परीक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. ब्रिटनमध्ये संवैधानिक राजेशाही असून राष्ट्रप्रमुख म्हणून राजा किंवा राणी असतात, तर भारताने प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारून राष्ट्रपती हे निवडून येणारे राष्ट्रप्रमुख निश्चित केले आहेत.
याचप्रमाणे ब्रिटनमध्ये विरोधी पक्षाकडे औपचारिक छाया मंत्रिमंडळ असते, जे सत्ताधारी मंत्रिमंडळाच्या प्रत्येक निर्णयावर देखरेख ठेवते. भारतात विरोधी पक्षाला महत्त्वाचे स्थान असले तरी अशा स्वरूपाची संस्थात्मक व्यवस्था अस्तित्वात नाही, असे त्यांनी नमूद केले.
दौऱ्यादरम्यान प्रा. डॉ. नेवे हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान, ब्रिटिश म्युझियम, नेहरू सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन तसेच रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिस यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनाही भेट देत आहेत. ब्रिटनची न्यायव्यवस्था, सार्वजनिक प्रशासन, स्थानिक स्वराज्य व्यवस्था आणि लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीचा ते प्रत्यक्ष अभ्यास करत आहेत.
याशिवाय, लंडन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चतर्फे आयोजित ‘हिस्टरी ऑफ पॉलिटिकल आयडियाज सेमिनार’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी त्यांची निवड झाली असून तेआज १ जुलै रोजी त्यात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात राजकीय विचारांचा इतिहास, लोकशाही मूल्ये आणि आधुनिक राज्यव्यवस्थेच्या वैचारिक पायाभरणीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांशी विचारांची देवाणघेवाण झाली. .
“भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रणालीचा स्वीकार केला असला, तरी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, लिखित संविधान, स्वतंत्र न्यायपालिका आणि संघराज्य व्यवस्था यांमुळे भारतीय लोकशाहीने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ब्रिटिश संसदेला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दोन्ही देशांच्या संसदीय व्यवस्थेतील साम्य आणि भिन्नता अधिक स्पष्टपणे समजली. राज्यशास्त्राचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकाच्या नात्याने हा अनुभव विद्यार्थ्यांना तुलनात्मक राज्यशास्त्र आणि जागतिक लोकशाही व्यवस्थेचा अभ्यास अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे,” असे प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी सांगितले.
या अभ्यास दौऱ्यातून प्रा. डॉ नेवे यांना मिळणारे अनुभव आणि संशोधनपर निरीक्षणे विद्यार्थी, संशोधक तसेच राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.














Discussion about this post