जळगाव । धरणगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंबीय २३ जून रोजी देवदर्शनासाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार केले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली. त्यानंतर संदीप थोरात (वय २६) आणि कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०, दोघेही रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव) यांना अटक करण्यात आली. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ६२ हजार रुपये रोख, ३ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची चांदीची लंगड आणि १० हजार रुपये किमतीची सुमारे ३.२१० ग्रॅम वजनाची सोन्याची लंगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.















Discussion about this post