जळगाव । अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर मशीन लावून नियमांची पायमल्ली करत सुरू असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशाप्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी अखेर अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
नेमके प्रकरण काय?
गत २६ मे रोजी महसूल आणि पोलीस प्रशासनाने सावखेडा येथील वाळू घाटावर संयुक्त छापा टाकला होता. यावेळी नियमांना हरताळ फासत मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे उघडकीस आले होते. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्थानिक पातळीवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सावखेडा येथील मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना तत्काळ निलंबित केले होते.
या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्यावर सोपवण्यात आली होती. प्रांताधिकाऱ्यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांचा अहवाल राज्य शासनाकडे पुढील कारवाईसाठी पाठवला होता. शासनाच्या महसूल विभागाने या अहवालाची गंभीर दखल घेत तहसीलदार सुराणा यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
कारवाईला उशीर का झाला?
जिल्हाधिकाऱ्यांनी मे महिन्यातच हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र, राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याने प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये म्हणून या कारवाईसाठी काहीसा विलंब झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता चोपड्याच्या तहसीलदारांवर नजर!
सावखेडा वाळू उपसा प्रकरणात अमळनेरच्या तहसीलदारांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्यानंतर आता या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर शासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू माफिकांसह बेफिकीर महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.















Discussion about this post