जळगाव । दैनिक बातमीदारचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार तथा जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त नरेंद्र (नाना)नेहेते (वय ७४) यांचे आज सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

नरेंद्र नाना नेहेते हे जळगाव शहरातील पत्रकारितेच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार आणि जाणकार होते. त्यांचे वडील स्व.विठ्ठल चावदास नेहेते यांनी स्थापन केलेल्या दैनिक बातमीदारच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण यामुळे त्यांचे पत्रकारिता क्षेत्रात विशेष स्थान होते.त्यांनी त्या काळात मुंबई येथून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेहेते परिवार यांचा घनिष्ठ स्नेह असल्याने कलानगर येथील मातोश्री निवासस्थानी ते या कालावधीत राहत होते.

जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पत्रकार संघाचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
आज सायंकाळी ८ वाजता अंत्ययात्रा
नरेंद्र नाना नेहेते यांची अंत्ययात्रा आज सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता त्यांच्या राहत्या घर बातमीदार निवास, हनुमान मंदिरासमोर, गोलाणी मार्केट, जळगाव येथून निघणार आहे. त्यांच्यावर नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.















Discussion about this post