मुंबई-नागपूर महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. टायर फुटल्यानंतर काही क्षणांतच ट्रकने पेट घेतल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले. मात्र, चालक आणि क्लीनर यांनी वेळेवर ट्रकमधून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
माहितीनुसार, गुजरात येथून रिफाइंड तेल, ऑइल पावडर तसेच इतर साहित्य घेऊन ट्रक हैदराबादच्या दिशेने जात होता. महामार्गावर प्रवास सुरू असताना अचानक टायर फुटल्याचा मोठा आवाज झाला आणि ट्रकमधून धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
धोका ओळखत चालक गौतम कुमार आणि क्लीनर यांनी तत्काळ ट्रक सोडून सुरक्षित अंतर गाठले. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. मात्र, आगीमुळे ट्रकसह त्यामधील माल जळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या काळात महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
प्राथमिक तपासात टायर फुटल्यामुळेच आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. ट्रक चालक गौतम कुमार यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली असून, प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले आहे.















Discussion about this post