यंदा मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली असली, तरी सध्या त्याने कोकणातच मुक्काम केल्याचे चित्र आहे. तळकोकणापर्यंत पोहोचलेले मान्सूनचे ढग अचानक अरबी समुद्रातून गायब झाले असून, पावसाने राज्यात पूर्णपणे विराम घेतला आहे. १५ ते २० जून दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असे हवामान खात्याचे आधीचे अंदाज सध्या तरी खोटे ठरताना दिसत आहेत. परिणामी, कडाक्याचे ऊन आणि उष्णतेच्या तीव्र लाटेने राज्यातील जनजीवन पुरते हैराण झाले आहे. त्यातच ‘स्कायमेट’ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, या संपूर्ण महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्यामुळे हा मान्सूनचा खंड पडला आहे. यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही सध्या शांत आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभावही महाराष्ट्रावर फारसा जाणवत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ वातावरण असूनही पाऊस मात्र पडत नाहीये. तर मुंबई, ठाणे आणि पालघरसह उपनगरांमध्ये नागरिक प्रचंड उकाड्याने त्रस्त आहेत.
विदर्भ-मराठवाड्यात पुढील ४८ तास उष्णतेची लाट
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील ४८ तास उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमानाचा पारा वाढलेलाच असेल. पावसाचा कोणताही अंदाज नसल्याने शेतकरी आणि नागरिक दोन्ही हवालदील झाले आहेत. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र, २० जून नंतर हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो, असा एक अंदाजही वर्तवला जात आहे. संपूर्ण भारतात मान्सून पूर्णपणे स्थिर होण्यासाठी आता जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.
क्षेत्रनिहाय हवामानाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर: हलक्या सरींची शक्यता
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा: मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित
विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली: गडगडाटासह पावसाची शक्यता
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र: पावसाची शक्यता अत्यल्प, कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता
हवामान विभागाने यंदा एकूण पावसाचे प्रमाण समाधानकारक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इंडियन ओशन डायपोल सक्रिय झाल्यास एल निनोचा प्रभाव कमी होऊन ऑगस्ट महिन्यात मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.















Discussion about this post