जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या १७ जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. महायुती ही निवडणूक एकत्र लढवणार असली, तरी जागांवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. जळगावची जागा भाजपला सुटल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या बातमीनंतर संतप्त झालेले शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने यापूर्वी घवघवीत यश मिळवल्यामुळे त्यांना जास्त जागा मिळणे स्वाभाविक मानले जात आहे. मात्र, जागांच्या संख्येवरून महायुतीत एकमत होताना दिसत नाही. शिवसेना शिंदे गट ६ जागांवर ठाम आहे, तर भाजप मात्र केवळ ४ जागा सोडण्यास तयार आहे. या अंतर्गत वादाचा फटका अनेक महत्त्वाच्या जागांना बसत आहे.
जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटलांची प्रतिष्ठा पणाला
जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट कमालीचा आग्रही आहे. या जागेसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्यांनी कालच उमेदवारी अर्ज देखील विकत घेतला आहे. मात्र, ही जागा भाजपला सोडली जात असल्याचे वृत्त येताच, गुलाबराव पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी थेट उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
‘मैत्रीपूर्ण लढती’ची आमदारांची मागणी
यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. “जळगावची जागा शिवसेनेलाच मिळावी, अन्यथा येथे ‘मैत्रीपूर्ण लढत’ लढण्याची परवानगी द्यावी,” अशी आक्रमक मागणी आमदारांनी केली आहे. या जागेबाबत उद्या सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post