नवी दिल्ली । एकीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) यांच्या आंदोलनामुळे वातावरण तापले असताना, दुसरीकडे सोशल मीडियावर ‘मख्खी जनता पार्टी’ नावाच्या नव्या पक्षाची चर्चा सुरू झाली आहे. सरन्यायाधीशांच्या कथित टिप्पणीशी या नावाची सांगड घातली जात असून, नव्या पक्षाच्या सोशल मीडिया खात्यावरील पोस्टवरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

CJPच्या आंदोलनादरम्यान मेट्रो स्थानके बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कथितरीत्या ‘माशी मारण्यासाठी हातोड्याचा उपयोग का करताय?’ असा सवाल केंद्र सरकारला केल्याची चर्चा आहे. या कथित टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर ‘मख्खी जनता पार्टी’ हे नाव चर्चेत आले आहे. या पक्षाचे सोशल मीडिया खातेही समोर आले असून, त्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि फॉलोअर्सकडे लक्ष वेधले जात आहे.

बेरोजगार तरुणांच्या टिप्पणीवरून CJPची स्थापना
१५ मे २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांना ‘झुरळं’ संबोधल्याची कथित टिप्पणी चर्चेत आली होती. यामुळे तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी या विधानाचा अर्थ सर्वसाधारण बेरोजगार तरुणांविरोधात नव्हता, तर बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारे वकिली करणाऱ्यांच्या संदर्भात होता, असे स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले जाते.
या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. त्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनामुळे या पक्षाची चर्चा देशभर झाली. पक्षाने यापूर्वीही विविध मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्षाने पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.















Discussion about this post