नवी दिल्ली । कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने दिपके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

अभिजित दिपके हे सध्या आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत असताना त्यांच्या आजीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी गेलेल्या दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आजीच्या निधनानंतर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी ते गावी कधी आणि कसे पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नातवाच्या आंदोलनाला आजीचा पाठिंबा
अभिजित दिपके यांच्या आंदोलनाच्या भूमिकेला त्यांच्या आजीनेही पाठिंबा दिला होता. मात्र, नातू आंदोलनात व्यस्त असतानाच आजीने जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा भावनिक धक्का मानला जात आहे. एकीकडे दिल्लीत आंदोलनामुळे राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे मूळ गावी आजीचे निधन झाल्याने दिपके कुटुंबावर दुःखाची वेळ आली आहे.
सध्या अभिजित दिपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना गावी जाण्याची परवानगी कधी मिळणार आणि ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहू शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post