मुंबई । महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्या आहे. अशातच या निवडणुकांबाबत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असला, तरी काही जागांवर रस्सीखेच अद्याप कायम आहे. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी या निवडणुका एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.

पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच सुरू आहे. संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, नागपूर पदवीधर मतदारसंगाची जागा भाजपकडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी देखील माहिती समोर आली आहे की, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र जागावाटपावरून अद्याप एका जागेवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच कायम आहे. त्यात पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात सध्या काँग्रेसचे जयंत आसगावकर आमदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात असून महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या जागेवरून शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी गेल्या काही काळापासून शिक्षक संघटनांशी संपर्क वाढवत निवडणुकीची तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपकडूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला जाते की शिवसेना शिंदे गटाला मिळते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post