मुंबई । राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी उडाली असून, एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीने मोठी खेळी खेळली आहे. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व १७ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामुळे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवू शकतो. काँग्रेसच्या वाट्याला सुमारे सात ते आठ जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला पाच ते सहा जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तीन ते चार जागा मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील जागावाटपाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून पुढील दोन दिवसांत अंतिम जागावाटप निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जागावाटपावरून कोणताही तिढा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र अजूनही जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात अनेक जागांवरून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीचा अंतिम फॉर्म्युला कधी जाहीर होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून २ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारांना ४ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. राज्यातील या निवडणुकांमुळे आगामी काही दिवस राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post