जळगाव । जामनेर शहरातील सुपारी बाग या निर्जन परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मृत तरुणाचे नाव असून कुटूंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा काल संध्याकाळपासून अचानक बेपत्ता झाला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने काळजीपोटी कुटुंबीय आणि त्याच्या मित्रांनी रात्रभर शहरात व परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. आज बुधवारी सकाळी सुपारी बाग परिसरातील एका निर्जन ठिकाणी रितेशचा मृतदेह नागरिकांना दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला आहे.
उष्माघात की घातपात?
रितेशच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या प्रकरणात दोन वेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. रितेशने मद्यप्राशन केले होते आणि त्यातच सध्या उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा एक प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मयत रितेशच्या पश्चात आई, वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. तरुण मुलाचा असा अचानक संशयास्पद मृत्यू झाल्याने बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जामनेर पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून, त्यांनतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.














Discussion about this post