जळगाव । राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता हवामानात हळूहळू बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी रात्रीच्या वेळी गारवा वाढत असल्याने नागरिकांना बदलत्या वातावरणाचा अनुभव येत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही सकाळी उष्णता आणि रात्री थंडावा असे संमिश्र वातावरण जाणवत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील कोणत्याही भागासाठी पावसाचा विशेष इशारा जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाची शक्यता कमी झाली असून, थंडीची चाहूल हळूहळू वाढू लागली आहे.
जळगावसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत सध्या दिवसा तुलनेने उष्ण वातावरण आहे. या भागातील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सूर्यास्तानंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. पुढील काही दिवस या भागात पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
८ नोव्हेंबर रोजी जळगावचे कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंशांपर्यंत नोंदवले गेले. जळगावकरांना दिवसा उन्हाचा आणि रात्री थंडाव्याचा अनुभव कायम राहण्याची शक्यता आहे.
पुणे, मराठवाडा आणि विदर्भातही कोरडे हवामान
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कमाल तापमान ३३ अंश आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातही पावसाने उघडीप दिली असून, कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
दिवाळीच्या काळात थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता
राज्यात सध्या दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे संमिश्र वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने घेतलेली विश्रांती आणि रात्रीच्या तापमानातील घट यामुळे हिवाळ्याची चाहूल लागली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता असून, दिवाळीच्या काळात रात्रीचा गारवा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.














Discussion about this post