जळगाव : दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यांमधील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भुसावळ ते देवळालीदरम्यान विशेष अनारक्षित मेमू गाडी सुरू करण्याचे नियोजन केले आहे. १० आणि ११ नोव्हेंबर असे दोन दिवस ही गाडी धावणार असून, या कालावधीत तिच्या चार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे खान्देशातून नाशिकच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सध्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यातच भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने अनेकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांची अनारक्षित विशेष मेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळी भुसावळहून सुटणार, दुपारी देवळालीला पोहोचणार
गाडी क्रमांक ०१२२६ भुसावळ-देवळाली विशेष मेमू १० आणि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता भुसावळ स्थानकातून रवाना होईल. ही गाडी दुपारी १.०५ वाजता देवळाली स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१२२५ देवळाली-भुसावळ विशेष मेमू १० आणि ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता देवळालीहून सुटेल. सायंकाळी ५ वाजता ती भुसावळ स्थानकावर पोहोचणार आहे.
जळगाव, पाचोरा, चाळीसगावसह प्रमुख स्थानकांवर थांबा
या विशेष गाडीला जळगाव जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या स्थानकांसह नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि नाशिक रोड येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.
सणासुदीच्या काळात नियमित गाड्यांमधील गर्दीचा ताण कमी करण्यासोबतच प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ही विशेष गाडी उपयुक्त ठरणार आहे. गाडीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास त्याची माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा एनटीईएस ॲप तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.














Discussion about this post