जळगाव : नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात खान्देशात थंडीने जोर पकडला असून धुळे आणि जळगावमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. धुळे शहरात यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. तर जळगावमध्येही पारा ८ अंशांपर्यंत खाली आल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे.
जळगावच्या तापमानात एका रात्रीत मोठी घसरण
जळगाव शहरात थंडीचा प्रभाव अचानक वाढला आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी १२.६ अंशांवर असलेले तापमान अवघ्या एका दिवसात ४.४ अंशांनी घसरले. त्यामुळे यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळी ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत असल्याने वातावरणातील गारठा अधिकच वाढला आहे. पहाटे घराबाहेर पडणारे नागरिक तसेच कामानिमित्त रात्री प्रवास करणाऱ्यांना थंडीचा विशेष त्रास जाणवत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
धुळ्यात तापमानाचा पारा ६.३ अंशांवर
धुळे शहरातही थंडीने यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळी गाठली आहे. कृषी केंद्रातील वेधशाळेने शनिवारी सकाळी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार किमान तापमान ६.३ अंश सेल्सिअस इतके होते. यापूर्वी धुळ्यात तापमानाचा पारा १० अंशांपर्यंत घसरला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या तापमानातील घटीने थंडीचा जोर अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाढलेल्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तोरणमाळमध्ये अद्याप थंडीचा प्रभाव कमीच
एकीकडे धुळे आणि जळगावमध्ये थंडीचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये मात्र अपेक्षित गारठा अद्याप जाणवत नाही. नोव्हेंबर महिन्याचा निम्म्याहून अधिक काळ उलटूनही तापमानात मोठी घट झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह थंड हवेचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यात तोरणमाळचे किमान तापमान १० ते ११ अंशांच्या दरम्यान होते. डिसेंबर महिन्यात तर पहाटेच्या वेळी दवबिंदू गोठण्याइतकी थंडी जाणवत होती. मात्र, यंदा शुक्रवारी येथील किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असून केवळ सकाळी आणि रात्रीच्या वेळेत काही प्रमाणात थंडी अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे यंदा तोरणमाळमध्ये थंडीचा जोर वाढण्याची पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.















Discussion about this post